चित्रकार प्रमोद नागपुरे यांचे एकल चित्रप्रदर्शन दि. २५ फेब्रुवारी ते ३ मार्च, २०२५ दरम्यान नेहरु सेंटर आर्ट गॅलरी मध्ये


चित्रकार प्रमोद नागपुरे यांचे एकल चित्रप्रदर्शन दि. २५ फेब्रुवारी ते ३ मार्च, २०२५ दरम्यान नेहरु सेंटर आर्ट गॅलरी मध्ये

प्रसिद्ध चित्रकार प्रमोद नागपुरे यांचे एकल चित्रप्रदर्शन “ड्रीमस्केप्स अँड रिअॅलिटीज” या शीर्षकांतर्गत मुंबईत नेहरू सेंटर आर्ट गॅलरी, वरळी, मुंबई येथे भरविण्यात आले आहे. कल्पनाशक्ती आणि वास्तवाचा संगम दर्शवणारे हे विलोभनीय चित्रप्रदर्शन रसिकांना दि. २५ फेब्रुवारी ते ३ मार्च, २०२५ या कालावधीत ११ ते ७ या वेळेत कलारसिकांना पाहायला मिळणार आहे. चित्र हे केवळ कॅनव्हासवर उमटलेले रंग नसतात, तर ते कलाकाराने अनुभवलेल्या, पाहिलेल्या आणि मनात उमटलेल्या स्वप्नांचे प्रतिबिंब असते. चित्रकार प्रमोद नागपुरे यांच्या चित्रप्रदर्शनातील प्रत्येक चित्र हे या भावनांचे आणि विचारांचे बोलके दर्शन घडवते. विविध विषय हाताळून, त्यातून जीवनाच्या विविध छटांचे दर्शन घडवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी आपल्या चित्रांत जुन्या आणि नव्या जगातल्या तफावतीला अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला आहे. पूर्वीचा निसर्गाशी असलेला जवळचा संबंध, मुक्तपणे विहार करणारे प्राणी-पक्षी, वाचनाची ओढ आणि आध्यात्मिकतेची रुजवण यासारखी दृश्ये जुन्या काळाचे प्रतिनिधित्व करतात. त्याच्या विरोधात, आजच्या युगात सर्वत्र दिसणारे मोबाईलचे व्यसन, काँक्रिटच्या जंगलात हरवलेली माणुसकी आणि वाढती अस्वच्छता या गोष्टींवर भाष्य करणारी चित्रे सादर करण्यात आली आहेत.

Advertisement

चित्रकार प्रमोद नागपुरे यांनी साकारलेल्या काही चित्रांत दगडी मूर्तीवर अचानक वीज पडल्यावर तिच्यात प्राण फुंकला गेला तर काय होईल, याचा विचार मांडला आहे. आई आणि मुलीच्या नात्याच्या अनेक हळव्या छटा टिपणारी चित्रेही लक्षवेधक ठरतात. एका चित्रात आई आपल्या मुलीला खोडकर वाकुल्या दाखवत आहे, त्यामुळे रुसलेली मुलगी बाजूला बसली आहे. तर दुसऱ्या चित्रात आवरून बसलेल्या मुलीचे आई कौतुक करताना दिसते. एका चित्रात आईला स्वतःच्या प्रतिबिंबाऐवजी तिचे बालपण आरशात उमटताना दिसते, तर कुठे मुलगी आपल्या आईला प्रेमाने कवेत घेण्याचा प्रयत्न करत आहे. कल्पनाशक्तीच्या अजून एका छटेत, एका भव्य फुलपाखराच्या दोन्ही पंखाभोवती व्यक्तिरेखा उभ्या आहेत, जणू त्या पंखांचाच एक भाग असल्यासारख्या वाटतात. ‘जलपरी’ या चित्रात समुद्रावर एका काचेच्या बरणीतून मासे सोडणारी व्यक्तिरेखा दिसते, तर दुसऱ्या चित्रात शांत समुद्रात एका पिंपळाच्या विशाल पानावर एक युवती निवांत पहुडलेली आहे.  तर पिंपळाच्या पानालाच बेट बनवले असून, त्याच्या आजूबाजूला कागदी होड्या, दीपस्तंभ आणि खेळण्यातील गाड्या दाखवून वेगळेपण आणले आहे. आधुनिक आणि पारंपरिक कलेचा मिलाफ दाखवणाऱ्या चित्रांमध्ये `रेड ड्रेस’ व `ब्लँकेट’ या चित्राचा विशेष उल्लेख करावा लागेल. `नो मोबाईल’ या चित्रात आजच्या पिढीला मोबाईलच्या विळख्यातून मुक्त करून वाचन आणि आध्यात्मिकतेकडे वळवण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच, पारंपरिक रेखाटनांमध्ये सरस्वती आणि राधा-कृष्ण यांच्या कलाकृती नजरेत भरतात. एका चित्रात युवती दगडमूर्तीप्रमाणे आपल्या भांगात कुंकू भरण्याचा प्रयत्न करत आहे, तर दुसऱ्या चित्रात खेळण्यांच्या गराड्यात लहान मुलगी आपल्या बाहुलीला घट्ट धरून बसलेली आहे.

या चित्रप्रदर्शनातील प्रत्येक कलाकृती वेगवेगळ्या भावनांचे आणि जीवनातील विविध पैलूंचे दर्शन घडवते. रंग, हावभाव, कल्पकता आणि वास्तव यांचा सुंदर मिलाफ या चित्रांमध्ये पाहायला मिळतो. प्रत्येक चित्रामध्ये वेगळेपण टिकवण्यासाठी केलेली मेहनत आणि त्यातील सूक्ष्म बारकावे सहज लक्ष वेधून घेतात


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!